Archive | February 2021

देवावर विश्वास ठेवा

नीती : श्रद्धा 

उपनीती : विश्वास 

https://saibalsanskaar.files.wordpress.com/2021/01/giving-hands-1245562-640x480-1.jpg?w=300

एक नवीन विवाहित व्यक्ती आपल्या तेजस्वी पत्नीसह घरी परतत होता. ते एका बोटीत सरोवर ओलांडत होते तेव्हा अचानक त्यांना एका तुफानी वादळाचा सामना करावा लागला. तो व्यक्ती एक योद्धा होता तो निडर होता, परंतु त्याची पत्नी खूपच घाबरली होती आणि निराश झाली होती.

त्यांची छोटी बोट वादळी लाटांवर फेकली जात होती आणि वादळाचा क्रूरपणा तिला धमकावत होता. कुठल्या ही क्षणी आपली बोट उलटेल आणि ते बुडतील अशी तिला भीती वाटत होती. पण, तो व्यक्ती निःशब्द बसला होता, शांत, आणि गप्प जणू सर्व काही सामान्य होते.

पत्नी, थरथरत्या आवाजात, तिच्या शांत असलेल्या नवऱ्याला विचारू लागली, “तुम्हाला भीती नाहीं वाटत का? हे आपल्या जीवनाचे शेवटचे क्षण असू शकतात! आपण सुखरूप किनार्‍यावर पोह्चू असे शक्य वाटत नाहीं. केवळ एक चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो; अन्यथा, मृत्यू अटळ आहे. तुम्हाला जरासुद्धा चिंता वाटत नाहीं? वेडे आहात की काय? तुम्ही पाषाणाचे बनलात की काय?

तो व्यक्ती हसला आणि आपल्या म्यानेतून तलवार काढली. पत्नी अजूनच  आश्चर्यचकीत झाली, आणि आपला पती आता काय करणार असे विचार करू लागली. मग त्याने ती नग्न तलवार तिच्या गळया जवळ आणली, इतकी जवळ की अतिशय थोडा अंतर राहिला होता, ती तिच्या गळ्यालाच शिवत होती.

त्याने आपल्या पत्नीला विचारले, “तुला भीती वाटली का?”

पत्नी हसू लागली आणि म्हणाली, “मी का घाबरू? मी जाणते तुम्ही माझ्यावर प्रेम करतात.” त्याने ती तलवार परत ठेवली आणि म्हणाला, “तुझ्या चिंताक्रांत अवस्थेचे हे माझे उत्तर आहे. मला ठाऊक आहे देव माझ्यावर प्रेम करतात  आणि हे वादळ त्यांच्या हातात आहे.”

अशा प्रकारे, जे काही व्हायचे आहे, चांगलेच होणार; कारण सर्वकाही त्यांच्याच हातात आहे आणि ते केंव्हाही चूक करत नाहींत.

शिकवण :आपण विश्वास विकसित केला पाहिजे आणि केवळ हेच आपल्या संपूर्ण जीवनात बदल घडवून आणण्यास सक्षम आहे. म्हणूनच, आपण आपल्या जीवनात हे सत्य आत्मसात करणे शिकले पाहिजे. ह्याहून काही कमी चालणार नाहीं.